हितधारकांशी सल्लामसलत करण्याचा या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राबवलेला उपक्रम सुरू ठेवत, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने (DA&FW) सल्लागार (AS & DA) जी. रुचिका गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली येथील कृषी भवनात हितधारकांशी दुसरी बैठक घेतली.ऑक्टोबर 2024 मध्ये नियोजित असलेल्या खरीप 2024 हंगामासाठी पहिला आगाऊ अंदाज जाहीर करण्यापूर्वी कापूस आणि उसासह तृणधान्ये आणि तेलबियांच्या उत्पादनाचे चित्र हा चर्चेचा केंद्रबिंदू होता.
खरीप 2024 हंगामातील पिकांच्या सध्याच्या उत्पादनाबाबत हितधारकांकडून महत्त्वपूर्ण अंदाज आणि प्रारंभिक मूल्यांकन गोळा करणे हा या सल्लामसलतीचा प्राथमिक उद्देश होता. या कृषी पिकांचे पहिले आगाऊ अंदाज तयार करण्यासाठी हे योगदान महत्वाचे असेल. बैठकीदरम्यान, सहभागींनी पीक स्थितीचे मूल्यांकन आणि अंदाज पद्धतींसह अनेक मुद्द्यांवर मौल्यवान विचार सामायिक केले. हितधारकांनी सादर केलेल्या सुरुवातीच्या मूलभूत अहवालानुसार, आगामी हंगामासाठी तांदूळ आणि मका उत्पादन आशादायक असेल. मात्र, पीक विविधतेमुळे या हंगामात कापसाचे एकरी उत्पादन कमी होण्याची अपेक्षा आहे.
मंत्रालय आणि उद्योग धुरिणी यांच्यात सुरू असलेल्या सहकार्याच्या आणि सातत्यपूर्ण माहितीच्या देवाणघेवाणीच्या महत्त्वावर एकमताने जोर देत हितधारकांबरोबरची सल्लामसलत संपन्न झाली. पीक उत्पादन अंदाजामध्ये अधिक अचूकता प्राप्त करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवितो.