ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धा २०२४चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत आझाद नगर नंबर २ येथील जय भवानी मित्र मंडळ हे पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. तर, सार्वजनिक उत्सव मंडळ, स्वातंत्र्यवीर सावरकर नगर यांना स्वच्छता पुरस्कारात प्रथम आणि गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास उत्कृष्ट मूर्तीकाराचा प्रथम क्रमांक मिळाला आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि विजयी ठरलेल्या सर्व गणेशोत्सव मंडळांचे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिनंदन केले आहे.
ठाणे महापालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत ठाण्यातील एकूण २१ मंडळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण करताना मूर्ती, सजावट, विषय मांडणी, हेतुपूर्ती, शिस्त व स्वच्छता तसेच कलावंतांचे काम या सर्व घटकांचा विचार करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ चित्रकार सदाशिव कुलकर्णी व किशोर नादावडेकर आणि पत्रकार पंकड रोडेकर यांनी केले.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकाविलेल्या जय भवानी मित्र मंडळाने 'निष्काळजीपणामुळे होणारी जिवितहानी' हा विषय त्यांच्या देखाव्यातून मांडला आहे. तर, द्वितीय क्रमांक महागिरी कोळीवाडा येथील एकविरा मित्रमंडळ यांना मिळाला आहे. त्यांनी 'कैफियत समाधानाची' हा विषय मांडला आहे. तृतीय क्रमांक गांधीनगर येथील शिवसम्राट मित्रमंडळ यांच्या 'सुरक्षितता' या विषयावरील देखाव्यास मिळाला आहे. चैतन्य मित्र मंडळ, जिजामाता नगर सोसायटी (विविध प्रकारच्या नशेचे दुष्परिणाम) यांना चौथा, सार्वजनिक उत्सव मंडळ, जय भवानी नगर (ग्लोबल वॉर्मिंग) यांना पाचवा, ओम शक्ती विनायक मित्र मंडळ, गांधीनगर (युवा भारत) यांना सहावा क्रमांक मिळाला आहे. सातवा क्रमांक शिवगर्जना मित्रमंडळ (बटणाचा देखावा) आणि आठवा क्रमांक केदारेश्वर मित्रमंडळ, आनंदनगर (काळाप्रमाणे बदललेली माणसे) यांना मिळाला आहे.