पंतप्रधान 29 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात करणार 11,200 कोटी रूपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण उद्या (29 सप्टेंबर रोजी) दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे.

जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. त्यामुळे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प (टप्पा-1) पूर्ण होत आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मार्गाचा खर्च सुमारे 1,810 कोटी रुपये आहे.

त्याचबरोबर सुमारे 2,955 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात येणाऱ्या पुणे मेट्रो टप्पा-1 च्या स्वारगेट-कात्रज विस्ताराची पायाभरणी सुद्धा पंतप्रधान करणार आहेत. सुमारे 5.46 किमी लांबीचा हा दक्षिणेकडील विस्तार मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज या तीन स्थानकांसह पूर्णपणे भूमिगत आहे.

सरकारच्या राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेस 20 किमी अंतरावर 7,855 एकर क्षेत्रावर पसरलेले बिडकीन औद्योगिक क्षेत्र पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत विकसित केलेल्या प्रकल्पात मराठवाडा विभागातील एक आर्थिक केंद्र म्हणून यात प्रचंड क्षमता आहे. एकूण 6,400 कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजूरी दिली असून तो तीन टप्प्यांमध्ये विकसित होणार आहे.

पंतप्रधान सोलापूर विमानतळाचेही उद्घाटन करतील. या विमानतळामुळे संपर्क सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होतील आणि सोलापुरात जाणारे पर्यटक, तिथले व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांसाठी ते अधिक सोयीचे होईल. सुमारे 4.1 लाख प्रवाशांना (वार्षिक) सेवा देण्यासाठी सोलापूरच्या विद्यमान टर्मिनल इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे.  भिडेवाडा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या कन्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *