राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (28 सप्टेंबर, 2024) तेलंगणामधील सिकंदराबाद येथील राष्ट्रपती निलायममध्ये भारतीय कला महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन केले. आठ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन राष्ट्रपती निलायमने ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय तसेच सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने केले आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा पर्यटकांसमोर मांडणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.
आपल्या देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले. ईशान्येकडील राज्यांची सांस्कृतिक विविधता, त्यांचे लोकनृत्य, संगीत, कला आणि पारंपरिक पोशाख हा आपल्या देशाचा वारसा आहे, असे त्या म्हणाल्या. हा महोत्सव म्हणजे नागरिकांना ईशान्य प्रदेशातील परंपरा आणि समुदायांची अधिक ओळख करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
हा महोत्सव सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना देण्याचीही संधी असल्याचेही राष्ट्रपती म्हणाल्या. हा महोत्सव आपल्या देशाच्या ईशान्य आणि दक्षिणेकडील भागांमध्ये सेतू म्हणून काम करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ईशान्येकडील कारागीर, कलाकार आणि समुदायांना त्यांच्या परंपरा आणि कलागुणांना सर्वांसमोर आणून सशक्त बनविण्यात हा उत्सव मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तेलंगणाचे राज्यपाल तसेच केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री यांच्या व्यतिरिक्त, ईशान्येकडील सर्व आठ राज्यांचे राज्यपाल आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.