‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ मध्ये नवी मुंबई महापालिकेला देशातली सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये लाभलेले मानांकन नागरिक, स्वच्छताकर्मींसह आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे व मेहनतीचे फलित असून त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करीत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यापुढील काळात आपले ‘सुपर स्वच्छ लीग’ मधील मानांकन टिकवून ठेवण्याची व त्यादृष्टीने शहर स्वच्छतेत अधिकाधिक प्रगती करण्याची व नाविन्यपूर्ण प्रकल्प व उपक्रम राबविण्याची जबाबदारी वाढली असल्याचे विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत प्रतिपादन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड व इतर विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
आगामी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2025’ ला सामोरे जाताना स्वच्छताविषयक करावयाच्या नियोजित बाबींचा कृती आराखडा आत्तापासूनच तयार करावा व त्याच्या कालबध्द अंमलबजावणीचा कार्यक्रमही ठरवावा असे निर्देश आयुक्तांनी दिले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सरळसेवा भरती – 2025 अंतर्गत 12 जिल्हयांमधील 28 केंद्रांवर झालेली ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया सुव्यवस्थितपणे पार पडली, त्याबद्दलही जिल्हयांच्या ठिकाणी जाऊन सुयोग्य चांगली कामगिरी करणा-या नियुक्त समन्वय अधिकारी व केंद्र निरीक्षक तसेच प्रशासन विभागासह संबधित सर्व घटकांचेही आयुक्तांनी अभिनंदन केले. नवीन येणा-या कर्मचा-यांना कार्यालयीन कामकाजाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजनही करुन ठेवावे असे त्यांनी सूचित केले.
यावेळी केंद्र सरकारच्या शहरी नियोजन सुधारणा अंतर्गत करावयाच्या नियोजित कामाचा आयुक्तांनी विभागनिहाय बारकाईने आढावा घेतला. मा.मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील 150 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागाने आपल्याशी संबधीत कार्यवाही काटेकोरपणे करावी असेही निर्देश त्यांनी दिले. जास्तीत जास्त नागरिकांनी महानगरपालिकेचा विविध करभरणा ऑनलाईन पध्दतीने करावा यासाठी अधिक प्रमाणात जनजागृती करावी असे निर्देश देतानाच आगामी महापालिका निवडणूकविषयक कामकाजाचाही आयुक्तांनी आढावा घेतला. सर्व विभागांच्या कामकाजाचा दैनंदिन तपशील देणारे डॅशबोर्ड्स अद्ययावत करुन घ्यावेत व त्यावरील तपशीलवार माहितीचे विभागप्रमुखांनी नियमित अवलोकन करावे व कार्यपध्दतीत अनुषांगिक सुधारणा कराव्यात असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.