अडथळ्यांची शर्यत

विटावा भुयारी मार्गावर खड्डेच खड्डे

ठाणे, प्रतिनिधी

ठाणे – बेलापूर मार्गावरील विटावा भुयारी मार्गावर पडणाऱ्या खड्ड्यांना बुजवण्यात तसच त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात ठाणे महापालिकेला सपशेल अपयश आल्याचं चित्र आहे. तब्बल चार दिवस दुरुस्तीसाठी विटावा सब वे बंद करून केलेली पेव्हर ब्लॉकची मात्रा अगदी पहिल्याच दिवशी काही तासांतच फोल ठरल्याचं चित्र होत. त्यानंतर वारंवार केलेली डागडुजी, अनेकदा खड्ड्यांवर केलेली थातुरमातुर भरणी, कधी उखडलेल्या पेव्हर ब्लॉकवर पुन्हा टाकलेले नवे ब्लॉक यानंतरही आजची परिस्थिती जैसे थेच आहे. अनेक प्रयोग, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करूनही यश न आल्याने महापालिका प्रशासनही आता हतबल झाली आहे का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

एकीकडे कोट्यवधींचा निधी खर्च करून शहरावर शहरं बांधण्यात ठाणेमहापालिका गुंग असतानाच भुयारी मार्गावरील खड्डे बुजवण्यात महापालिकेला काही केल्या यश आलेलं नाही. यापूर्वी वारंवार काँक्रीटीकरणतर यानंतर हे खड्डे बुजविण्यासाठी केलेला पीआयसीसी या जलरोधक काँक्रीटीकरणाचा प्रयोगहा देखील फोल ठरल्यानंतर महापालिकेने पेव्हर ब्लॉकचा वापर करण्याची नामी शक्कल लढवली होती. हे पेव्हर ब्लॉक रस्त्यावर पांघराण्यासाठी चार दिवसांचा अवधी देखील घेण्यात आला होता. मात्र यानंतर हा सबवे खुला होताच बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉक अक्षरश: उखडले गेल्याने आधीच चार दिवस वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या ठाणेकरांवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. हे उखडलेले पेव्हर ब्लॉक पुन्हा बसवण्यासाठी महापालिकेने शर्थीचे प्रयत्न देखील केले मात्र त्यानंतरही चित्र न बदलल्याने कामाच्या दर्जाविषयीच सर्वसामान्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले होते. शनिवार – रविवार अनेक कंपन्यांना सुटी असल्याने या रस्त्यावर कमी वाहतूक असल्याचे हेरून या दिवसांत हि डागडुजी करण्याचं सत्रच महापालिकेने हाती घेतलं होत. मात्र वारंवार या मार्गावर डागडुजी केली गेली असूनही खड्डे काही बुजलेले नाहीत. याचा फटका सर्वसामान्यांना पडत असून रस्त्यावरून जाताना वाहनांना अडथळ्यांची शर्यत करावी लागत असल्याने वाहतूक मंदावल्याचं चित्र सध्या दिसत आहे.

छायाचित्र : गणेश कुरकुंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *