पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त नागली, वरईपासून बनविलेले पदार्थ खाण्याची संधी

ठाणे दि १५: केंद्र सरकारने हे वर्ष ‘राष्ट्रीय पौष्टिक अन्नधान्य वर्ष’ म्हणून जाहीर केले असून, त्याअंतर्गत तृणधान्य पिकांना पौष्टिक अन्नधान्याचा दर्जा देण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील समिती सभागृहात उद्या १६ तारखेस दुपारी ४ वाजता पौष्टिक तृणधान्य दिनही आयोजित करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात पिकणाऱ्या नागली, वरई या पौष्टिक तृणधान्यांपासून बनविलेल्या पदार्थांचे स्टॉल्सही उद्या शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात लावण्यात येणार असून हे पदार्थ बचत गटांनी बनविलेले आहेत. या स्टॉल्सचे उद्घाटन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे तसेच यानिमित्त एका घडी पुस्तिकेचे विमोचनही करण्यात येईल.

ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने तसेच आत्मा चे प्रकल्प संचालक चांदवडे यांनी यासंदर्भात माहिती दिली की,  तृणधान्यांमुळे कमी पर्जन्‍यमानात वाजवी उत्पादन मिळू शकते. पौष्टिक अन्‍नधान्‍याच्‍या वापराबाबत जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. ‘तृणधान्‍यांना पौष्टिक अन्‍नधान्‍य म्‍हणून जाहीर करण्यात आले आहे. ही पौष्टिक अन्‍नधान्‍ये कमकुवत लोक, मुले, स्त्रिया, गरीब शेतकरी वर्गातील लोकांना पोषण देतात.

या ठिकाणी माहिती देणारे एक छोटेसे प्रदर्शनही लावण्यात येणार असून आरोग्य, शिक्षण, महिला व बाल विकास विभागांची आरोग्य आणि आहार विषयक माहितीही त्याद्वारे देण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *