प्रासंगिक : ठाण्याच्या मुक्तीची गाथा!

२७ मार्च हा ठाणे शहराच्या दृष्टीने अतिशय पवित्र दिवस आहे, कारण २७९ वर्षांपूर्वी म्हणजे २७ मार्च १७३७ रोजी सव्वादोनशे वर्षांच्या पोर्तुगिजांच्या अन्यायकारी गुलामीतून ठाण्याची मुक्तता झाली. त्या संघर्षांचा इतिहास अतिशय प्रेरणादायी आहे.
१५०० सालच्या सुमारास व्यापाराचे निमित्त करून आलेल्या पोर्तुगिजांनी हळूहळू सत्ता प्राप्त करून कोकणातील प्रजेला गुलाम करून संपत्ती आणि धर्मातरासाठी अतोनात अत्याचार केले. शिवराय आणि संभाजीराजांनी त्यांच्या दुष्कृत्यांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला होता. संभाजीराजांच्या पश्चात औरंगजेबाच्या आक्रमणाचा फायदा उठवून पोर्तुगिजांनी पुन्हा थैमान घातले होते. त्यांच्या अत्याचाराला कंटाळलेली प्रजा शाहू छत्रपती आणि पेशव्यांकडे सतत गाऱ्हाणे घालत होती. बाजीराव पेशव्यांनी आपले धाकटे बंधू चिमाजी आप्पा यांच्यावर पोर्तुगिजांच्या ताब्यातील ठाणे-वसई भागाला मुक्त करण्याची जबाबदारी सोपवली. गुढीपाडव्याचा सण साजरा करून मराठी फौज मोहिमेवर निघाली. चिमाजी आप्पांनी मराठी सैन्याचे दोन भाग केले होते. शंकराजी केशव फडके यांच्या नेतृत्वाखाली एक सैन्यभाग वसई जिंकावयास, तर सुभेदार बलकवडे आणि सुभेदार खंडोजी मानकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे-साष्ठी जिंकावयास दुसरे सैन्य निघाले होते. पोर्तुगिजांच्या अत्याचाराला कंटाळलेला ठाणे-वसई परिसरातील सर्व समाज मराठय़ांच्या फौजेला सर्व प्रकारचे सहकार्य करावयास सिद्ध झाला होता. त्यांचे नेतृत्व मालाडचे अंताजी कावळे तसेच अणजूर गावचे गंगाजी, मुऱ्हारजी, बुबाजी, शिवाजी, नारायण नाईक अंजूरकर बंधू करीत होते.
पोर्तुगिजांचा ठाणे प्रांताचा सुभेदार होता लुई बहेलो. याच्याच मार्गदर्शनाखाली इंजिनीअर अँद्रो रिबेरो कुतिन्हु याने इ.स. १७३४च्या सुमारास ठाणे शहराला भक्कम तटबंदीने बंदिस्त केले होते आणि त्यात सुसज्ज बालेकिल्ल्याची उभारणी केली होती. यामुळे मराठी सैन्यासमोर मोठे आव्हान होते. २६ मार्च १७३७च्या रात्री खाडीच्या बाजूकडील पाणबुरूज आणि तटबंदीवर शिडय़ा लावून अचानक हल्ला केला. स्थानिक रहिवासी लक्ष्मण राऊत, हंसा कोळी, बुवाजी नाईक अंजूरकर यांच्या साहाय्याने खाडीच्या बाजूने किल्ल्यात प्रवेश मिळविला. होनाजी बलकवडय़ांनी आपल्या सैन्यासह ठाण्याच्या जमिनीकडील बाजूने हल्ला केला. त्यांच्याबरोबर इतर अंजूरकर बंधू, रामाजी महादेव, रामचंद्र हरि होते. तुकनाक, धोंडनाक, गणनाक, फकीर महंमद ही स्थानिक मंडळी मोलाची मदत करीत होती. मराठय़ांच्या या अचानक झालेल्या हल्ल्याने माघार घेऊन लुई बहेलो याने सर्व फौजेसह कुटुंबकबिल्यासह पलायन केले. रणवाद्य वाजवत मराठय़ांनी ठाण्यात प्रवेश केला. अशा पद्धतीने आपल्या पराक्रमाची शर्थ करून सव्वादोनशे वर्षांच्या पारतंत्र्यातून महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी ठाणे-साष्ठीवर शिवरायांचा भगवा फडकला. या कामगिरीबद्दल चिमाजी आप्पा पेशव्यांनी सर्व पराक्रमी योद्धय़ांचा यथोचित सन्मान केला. कोणाला सोन्याची कडी, कोणाला सोन्याच्या मोहरा, तर विशेष कामगिरी करणाऱ्यांना वतने-जमिनी इनाम दिल्या. अशा पद्धतीने मराठय़ांनी एका पाश्चात्त्य आधुनिक पोर्तुगीज सत्तेच्या जोखडातून ठाणे-साष्ठी मुक्त करून देदीप्यमान इतिहास घडवला. त्याचे स्मरण करणे यथोचित आहे. सह्य़ाद्री प्रतिष्ठानच्या वतीने २७९वा ठाणे मुक्ती दिवस साजरा करण्यात येणार आहे. ठाणे मुक्त करणाऱ्या पराक्रमी योद्धय़ांच्या वारसांच्या उपस्थितीत ठाणे किल्ला आणि ठाण्याचे ग्रामदैवत येथे यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

सौजन्य : लोकसत्ता / https://www.loksatta.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *