साहेब आदेश द्या !

ठाणे विशेष प्रतिनिधी

ठाणे -बेलापूर रोडवर पडलेले खड्डे, कळवा पुलाचे सुरु असलेले बांधकाम, दुरुस्ती कामासाठी बंद करण्यात आलेला मुंब्रा बायपास, विटावा सबवेचा अरुंद रस्ता आणि या रस्त्यावर उखडून पडलेले पेव्हर ब्लॉक या सगळ्यातून वाट काढत जाणारा स्थानिक कळवेकर – विटावकर यांच्यासोबत पुढे मुंबई – ठाण्यात जाणारा चाकरमानी देखील आता वाहतूककोंडीला प्रचंड त्रासाला आहे. वाहतुकीचे वाजलेले तीन तेरा आणि दिवसागणिक वाढत चाललेली वाहतूक कोंडी यावर प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांना नेमकी गती कधी येणार, हि वाहतूक कोंडी कधी सुटणार आणि हा प्रवास सहज सुखाचा कधी होणार असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. ‘शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना’, असं बिरुद मिरवणाऱ्या शिवसेनेचा पालकमंत्री, स्थानिक नगरसेवक असूनही आणि याशिवाय ठाणेमहापालिकेवर सत्तेवरदेखील शिवसेना असूनही इथल्या यंत्रणेला हा पेच सोडवण्यात गेली अनेक वर्षे सपशेल अपयश आल्याने आता सेनेच्या ‘साहेबांनीच आदेश द्यावा’ तरच हि यंत्रणा कामाला लागेल अशी आशा ठाणेकरांना आहे.

ब्रिटीशकालीन कळवा पुलावरील वाहतूक बंद केल्यानंतर नव्या अरूंद पुलावरील वाहतुकीचा ताण वाढला असून हि वाहतूक थोपवायला ठाणे पोलिसांना कंबर कसावी लागली आहे. एकीकडे विटावा सबवेवर ठाणे महापालिकेकडून केली गेलेली पेव्हर ब्लॉकची मात्रा सबशेल फेल गेली असतनाच दुसरीकडे नियोजनांच्या  अभावामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल होत चालला आहे. दरम्यान, प्रशासनाने विटावा ते कोपरी या अंतरासाठी खाडीवर नव्या पुलाची उभारणी करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असतानाच या पुलाच्या कामावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. राजकीय नेत्यांच्या राजकारणात रखडलेली ठाण्यातील विकासकामे याच उत्तम उदाहरण म्हणून कळवा ब्रिजकडे बोट दाखवता येईल. गेली अनेक वर्षे वाहतूक कोंडी होत असूनही त्याची दखल प्रशासनामार्फत अजूनही गांभीर्याने घेतली नसल्याने त्याचा त्रास दररोज लाखो नागरिकांना होत आहे. राजकीय मतभेद, नियोजनाचा नेमका अभाव, वाहतूक नियोजनासाठी असलेली अपुरी पोलीस यंत्रणा अन दिवसागणिक वाढत चाललेली वाहनांची संख्या याचा फटका सर्वसामान्यांना बसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

गेली तब्बल दोन ते अडीज वर्षे हि वाहतूक कोंडी सातत्याने वाढली असून हा  रेंगाळलेला प्रश्न सोडवण्यासाठी सरकार दरबारी शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचं दिसत असलं तरीही प्रत्यक्षात या प्रयत्नांना यश आल्याचं दिसत नसल्याने यावर राजकीय श्रेष्ठींनी हस्तक्षेप करण्याची आता गरज भासली आहे. मातोश्रीवरून आलेला आदेश हा सेनेत अंतिम मनाला जात असल्याने या वाहतूक कोंडीसाठी आता ‘वरून’च सूत्र हलवण्याची गरज असून साहेब आदेश द्या, म्हणजे पालकमंत्री एकनाथ शिंदे या विषयाला गती देतील असा आशावाद सर्वसामान्यांना लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *