फटाके न फोडता ठाण्यात बालचमू साकारताहेत गडकिल्ले

ठाणे:दीपावलीच्या सणात एकीकडे फटाके,फराळ आणि डोळे दिपवणारी रोषणाई सगळीकडेच पाहायला मिळते.मात्र,या साऱ्या खर्चिक उपक्रमांना बगल देत ठाणे पूर्वेकडील श्री पवनसुत सेवा प्रतिष्ठानचे बालशिलेदार आगळ्यावेगळ्या प्रकारे दिवाळी साजरी करतात.गेली 20 वर्ष या मंडळाचे शिलेदार फटाके न फोडता दरवर्षी एक किल्ला पाहून त्याची हुबेहूब प्रतिकृती साकारून छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास जागवण्याची परंपरा जपली आहे.यंदादेखील या बालचमूनी छत्रपती शिवरायांचे जन्मस्थानकिल्ले शिवनेरी साकारून नव्या पिढीला स्वराज्याच्या इतिहासाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे.हा किल्ला पाहण्यासाठी दर्शकांची रीघ लागत असून शिवनेरी किल्याची ही प्रतिकृती साऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.

  दिवाळी सणात फटाके फोडल्याने वायू प्रदूषण,ध्वनी प्रदूषण होत असल्याने या विरोधात व्यापक जनजागृती होऊ लागली आहे.या पार्श्वभूमीवर पवनसुत प्रतिष्ठानच्या शिलेदारानी गेली 20 वर्षे आपला सामाजिकतेचा वसा जपला आहे.दिवाळी सणात फटाके न फोडता दरवर्षी एखादा तरी किल्ला पाहून पर्यटनाचा आनंद लुटतात.किंबहुना दिवाळीत त्या किल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारून इतिहासाची ओळख शहरवासियांना करून देत आहेत.ठाणे पूर्वेकडील कोपरी रेल्वे स्थानकानजीक तब्बल साडेचार फुट उंचीचा शिवनेरी किल्ला साकारण्यासाठी माती,दगड,सिमेंट आणि गेरूचा वापर करण्यात आला असून गडावरील सर्व बारकावे दर्शवताना केलेली कलाकुसर वाखाणण्याजोगी आहे.याबाबत बोलताना या शिलेदारांनी,महाराष्ट्राला गड-किल्याचा जाज्वल्य इतिहासाची परंपरा लाभली आहे.तेव्हा,प्रत्येक नागरिकाला छत्रपती शिवरायांचे कर्तुत्व माहित होणे त्याचबरोबर आपली परंपराही जतन होण्यासाठी असे उपक्रम साऱ्यांनीच राबवले पाहिजेत.असा उद्देश विषद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *