पुणे: विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात पुण्यातील खडकवासला मतदार संघात निवडणूक तिकीटावरून चुरस पहायला मिळणार आहे. सध्या खडकवासला मतदार संघात भाजपचे भीमराव तापकीर विद्यमान आमदार आहेत. ते सलग ३ वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यावर भाजपकडून खडकवासला जागेसाठी तापकीर यांच्या नावाचा विचार केला जाईल.
तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील रमेश कोंडे हेही खडकवासला मतदारसंघात सक्रीय आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रमेश कोंडे हे खडवासला मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. परंतु त्यावेळेला त्यांनी युतीचा आदर ठेवत माघार घेतली होती. पण
त्यानंतर त्यांनी या मतदार संघात दांडगा संपर्क ठेवत आपली फळी मजबूत ठेवली आहे. खडकवासला मतदार संघातील जनेतच्या मनातही त्यांनी विविध लोकोपयोगी कामे करत स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे सध्या भाजपकडे असलेल्या खडकवासला मतदार संघावर एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या म्हणजेच रमेश कोंडे यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक रमेश कोंडे यांनी घेतली. त्यावेळी कोंडे यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांचा होता. जनसामान्यांचा देखील हाच कौल मतदार संघात दिसत आहे. त्यामुळेच रमेश कोंडे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे असे दिसते.